
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क :-
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.
आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.इ.स. २०१२ मध्ये, “द ग्रेटेस्ट इंडियन” नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले. शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते. पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.



नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले.आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला ‘महापरिनिर्वाण स्थळ’ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार “ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक” आहे.


२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली. ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.
३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी “आम्ही शासनकर्ती जमात बनणार” या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती. आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे. त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली.
गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार”या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते.”
अशा या महामानवास दैनिक वृत्तवेग तसेच चॅनेल परिवाराकडुन विनम्र अभिवादन… मुख्य संपादक गणेश अनिल वायदंडे.
