
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या महान कार्याचे आणि जीवनाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असून, या सहली नागरिक,पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बि.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तर नागपूर येथील दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा समावेश आहे. सदर टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व नागरिक/ पर्यटकांना या सहलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
