
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
सांगली : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांकडील पथकांनी वेगवेगळ्या १७ गुन्ह्यांत ८१३ किलो अमली पदार्थ जप्त केले होते. यात गांजा, कोकेन, ब्राऊन शुगरचा समावेश होता. हा साठा जाळून नष्ट करण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक रासायनिक विश्लेषक समाधान नरवडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरभड, सहायक निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार, हवालदार संकेत मगदूम, सोमनाथ पतंगे उपस्थित होते.


जिल्ह्यातील सांगली शहर, मिरज शहर, सांगली ग्रामीण, कुपवाड एमआयडीसी, उमदी, कवठेमहांकाळ, तासगाव, कुरळप व आष्टा या नऊ पोलिस ठाण्यांकडील पथकांनी १७ गुन्ह्यांत ८४ लाख रुपये किमतीचा ८१३.२३ किलो गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन जप्त केले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या बैठकीत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीला कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक घुगे यांनी दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या ९ पोलिस ठाण्यांकडील १७ गुन्ह्यांत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त करून घेतले. यानंतर पोलिस महासंचालक, दहशतवादविरोधी पथक मुंबई, सीआयडी पुणे व केंद्रीय यंत्रणांची परवानगी घेण्यात आली. केंद्रीय अमली पदार्थ गोदामामध्ये जमा केलेला गांजा, कोकेन, ब्राऊन शुगर हा मुद्देमाल मिरज एमआयडीसीतील सूर्या सेंटर ट्रेटमेंट फॅसिलिटीमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.
