राजकारण्यांना सुरात आणि तालात चालवायचं असेल तर पत्रकारांची लेखणी आक्रमकच राहिली पाहिजे :- ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे :

Spread the love

राजकारण्यांना सुरात आणि तालात चालवायचं असेल तर पत्रकारांची लेखणी आक्रमकच राहिली पाहिजे :- ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे :

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-मिरज.

राजकारण्यांना सुरात आणि तालात चालवायचं असेल तर पत्रकारांची लेखणी आक्रमकच राहिली पाहिजे. देशात खऱ्या अर्थाने लोकशाही अबाधित ठेवण्याची जबाबदारी पत्रकार हे पार पाडत आहेत, असं मत ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी मंत्री जयकुमार गोरे हे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे होते. खासदार विशाल पाटील, ज्येष्ठ संपादक संजय भोकरे, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, सांगली जिल्हाध्यक्ष राहुल मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्यासहित राज्यभरातील विविध माध्यमातील संपादक, पत्रकार या अधिवेशनात सहभागी झाले होते.

डिजिटल मिडियाचे महत्त्व वेगाने वाढत आहे. पत्रकारितेमध्ये डिजिटल मीडिया हे महत्वाचे माध्यम बनले आहे, निर्भीडपणे चांगल्या आणि वाईट गोष्टी मांडणाऱ्या पत्रकारांच्या मुळेच राजकीय नेतृत्व घडवले जात असते, असं सांगून जयकुमार गोरे पुढे म्हणाले, एक राजकारणी घडायला फार वेळ लागतो. प्रस्थापित नेते आणि राजे महाराजे यांच्या विरोधात लढा उभा करून मी राजकारणात यशस्वी होऊ शकलो हे फक्त पत्रकारांच्या पाठबळामुळेच…. काही दिवसापूर्वी माझ्यावर खोटे आरोप केले. या प्रकरणातील अनेकांचे कॉल रेकॉर्डिंग माझ्या मोबाईल मध्ये आहेत, फक्त तपास सुरू आहे, म्हणूनच मी आता गप्प आहे, असा गोप्यस्फोट ही मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.

प्रस्थापित लोकांना विरोध करणे फार कठीण असते. राजकीय क्षेत्रात मोडून पाडण्याची स्पर्धा असते, असं सांगून जयकुमार गोरे पुढे म्हणाले, पीडित, वंचित आणि विस्थापित राजकारण्यांची सुद्धा एखादी संघटना काढावी लागेल, अशी मुश्किल टिपणीही मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केली.

पत्रकारांच्यासाठी घरकुल योजना सुरू करण्यात यावी त्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अर्थसहाय उपलब्ध करून दिल जाईल अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी यावेळी दिली.

राजकर्ते चुकले तर त्यांना फोडले गेलेच पाहिजे. पण पत्रकारिता ही टार्गेट करून केली जाऊ नये. निर्भीडपणे पत्रकारिता करीत असताना दोन्ही बाजू ह्या वस्तुनिष्ठ पणे मांडल्या गेल्या पाहिजेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं.

दरम्यान जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या साठी सरकारने आरोग्य योजना सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी केली. अधिवेशनाचे प्रास्ताविक डिजिटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन समीर देसाई यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *