
निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी एज्युकेशन सेंटरचे उद्घाटन संपन्न.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-(मिरज) जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.
निर्मल हॉस्पिटल, मिरज येथे आणखी एक विशेष वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली असून, निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी एज्युकेशन सेंटर ची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष केंद्राचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील यादव यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी एज्युकेशन सेंटरचे संचालक डॉ. चंद्रशेखर हळिंगळे, सहसंचालक डॉ. निशा हळिंगळे,डॉ. राजकिरण साळुंखे, श्री. सूर्यकांत हळिंगळे, प्राचार्या डॉ. माधुरी वांगपाटी,प्रीती शिंदे तसेच निर्मल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय व व्यवस्थापन कर्मचारी उपस्थित होते. या वेळी नर्सिंग विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग देखील उपस्थित होता.

कार्यक्रमात बोलताना श्री. सुनील यादव यांनी मुलांमध्ये आढळणाऱ्या विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. त्यांनी पालकांना मुलांच्या वाढीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. विशेषतः भाषाविकास, सामाजिक संवाद कौशल्ये आणि वर्तणूक बदलांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी सांगितले की, या सेंटरमध्ये ऑटिझम, ADHD, मेंदूविकासाशी संबंधित अडचणी, वाचन व लेखन समस्या (Dyslexia), बोबडेपणा आणि इतर बालविकास समस्यांवर वैद्यकीय तसेच थेरपीच्या माध्यमातून उपचार दिले जाणार आहेत.डॉ. निशा हळिंगळे यांनी मुलांमध्ये वाढणाऱ्या न्यूरोडेव्हलपमेंटल आणि लर्निंग डिसऑर्डर्सबद्दल सखोल माहिती दिली. तसेच, या सेंटरच्या माध्यमातून अशा विशेष गरजा असलेल्या मुलांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. माधुरी वांगपाटी यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलांमध्ये आढळणाऱ्या शिकण्यासंबंधित अडचणी, वर्तणूक समस्यांवर उपाय आणि शैक्षणिक मदतीचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. विशेष मुलांसाठी योग्य पद्धतीने शिक्षण आणि थेरपी यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या सर्व सुविधा निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी एज्युकेशन सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी एज्युकेशन सेंटर हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आधुनिक केंद्र असून, विशेष मुलांसाठी विविध उपचारपद्धती, थेरपी आणि शैक्षणिक सहाय्य पुरवले जाणार आहे.

