
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करणारा इसम जेरबंद
२ किलो ३०० ग्रॅम वजनाचा तयार गांजा जप्त.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क
सांगली:-
श्रीमती रितू खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक सांगली व श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणारे इसमांबाबत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचित केले होते.
त्याप्रमाणे दि. १४.०२.२०२५ रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोना/नानासाहेब चंदनशिवे यांना गोपनीय माहीती मिळाली की, धनंजय भोसले हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा अंमली पदार्थाची विक्री करणेसाठी मिरज येथील रजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापुर ते पंढरपुर जाणारे एनएच १६६ चे उड्डाण पुलाखाली येणार आहे, अशी बातमी मिळाली. सदर बातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकास छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले.वरील प्रमाणे नमूद डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिरज येथील रजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापुर ते पंढरपुर जाणारे एनएच १६६ चे उड्डाण पुलाखाली पंच, फोटोग्राफर यांचेसह जावून तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठीकाणी हातात केसरी रंगाची कापडी पिशवी घेवून एक संशयित इसम येवून थांबला. त्याचा संशय आल्याने पोलीस पथकाने त्यास पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत संशयित धनंजय बळवंत भोसले, वय ३३ वर्षे, रा. साई मंदीर पाठीमागे, एमआयडीसी रोड, मिरज, ता. मिरज, जि. सांगली याचेकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण ५७,५१०/- रु. किंमतीचा २ किलो ३०० ग्रॅम वजनाचा तयार गांजामालाचा साठा जप्त केला असून त्याचेकडे तपास केला असता, त्याने सदरचा गांजामाल गुन्हयातील इतर संशयित सुरज नागनाथ सरवदे, रा. सोलापूर याचेकडून मागवून मिरज परीसरात किरकोळ स्वरुपात विक्री करुन वितरण करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करीत आहेत.