
त्रास देणारा कोणत्याही पक्षातला असला तरी कारवाई करा.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क पिंपरी:-
आम्हाला ब्लॅकमेल केले जाते, त्रास दिला जातोय, खंडणी वसुली केली जात आहे, अशा तक्रारी उद्योजकांकडून वारंवार येत असतात. मात्र, आता यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. उद्योग असो वा उद्योजकाला त्रास देणारा कोणत्याही पक्षाचा असो, त्याला सोडू नका. त्याच्यावर थेट ‘मोका’ लावा. या लोकांवर ‘मोका’च्या खालची कारवाई करायचीच नाही, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. ६) येथे पोलिसांना दिले.पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयकार्यालय, म्हाळुंगे औद्योगिक पोलिस संकुल, तसेच पोलिस विश्रामगृह देहूरोड या इमारतींच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह स्थानिक आमदार, अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर आणि त्याच्या आसपास मोठा औद्योगिक भाग विकसित होत आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज होती आणि ते स्थापन करण्यात आले. मात्र, अधूनमधून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक वसाहतीतून किरकोळ तक्रारी येतात, उद्योजक सांगतात की, त्यांना त्रास दिला जातोय, ब्लॅकमेल केले जात आहे आणि वसुली केली जात आहे. यापुढे हे प्रकार सहन केले जाणार नाहीत. आज मी तुम्हाला अधिकृत आदेश देतो की, उद्योगांना, उद्योजकांना त्रास देणारे कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत, महायुतीचे, अजितदादांचे किंवा शिंदे साहेबांचे, त्यांना सोडायचे नाही, कोणताही पक्ष किंवा नेता असो, त्यांच्यावर तडजोड केली जाणार नाही. उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर थेट मोका लावा, कोणतीही कमी दर्जाची कारवाई करायची नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना सांगितले.
पुणे जिल्हा महाराष्ट्राचे उत्पादन व तंत्रज्ञान केंद्र
पुणे जिल्हा हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्नॉलॉजी कॅपिटल आहे. सध्या राज्य सरकार जगभरातील गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. ही गुंतवणूक सुरळीत राहण्यासाठी आणि उद्योगस्नेही वातावरण टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.