कोल्हापूर परिक्षेत्राला नवे नेतृत्व.रंजन शर्मा यांच्याकडे विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची धुरा; सुनील फुलारी यांची ‘सीआयडी’त बदली

Spread the love

कोल्हापूर परिक्षेत्राला नवे नेतृत्व रंजन शर्मा यांच्याकडे विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची धुरा; सुनील फुलारी यांची ‘सीआयडी’त बदली

दैनिक वृत्तवेग कोल्हापूर:- रंजन शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून ते २५ मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत. तर विद्यमान विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) अर्थात ‘सीआयडी’मध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्य गृह विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले.

फुलारींच्या कार्यकाळात संघटित गुन्हेगारीवर लगाम

डिसेंबर २०२२ मध्ये कोल्हापूर परिक्षेत्राची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनील फुलारी यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण भागात संघटित गुन्हेगारीविरोधात आक्रमक मोहीम उघडली होती. टोळीप्रमुखांसह त्यांच्या साथीदारांवर ‘मोका’अंतर्गत कारवाया करून गुन्हेगारीला मोठा आळा घालण्याचे काम त्यांनी केले. कायदा-सुव्यवस्था राखताना कठोर आणि परिणामकारक अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

२००६ बॅचचे आयपीएस अधिकारी

रंजन शर्मा हे महाराष्ट्र कॅडरचे २००६ बॅचचे भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी आहेत. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेतून थेट निवड झाल्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. पुणे शहर पोलिस सहआयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुन्हे अन्वेषण, संघटित गुन्हेगारी विरोधातील कारवाया आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर प्रभावी कामगिरी बजावली.

कोल्हापूर परिक्षेत्राकडून नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा

कोल्हापूर परिक्षेत्रात वाढती संघटित गुन्हेगारी, आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर रंजन शर्मा यांच्या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिले जात आहे. कठोर प्रशासनशैली आणि तपास कौशल्यासाठी ओळख असलेल्या शर्मा यांच्या नेतृत्वाखाली परिक्षेत्रातील पोलिस यंत्रणेला नवी धार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *