
मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम आवळे यांचे निधन
मिरज : लोकमान्य टिळक नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते धोंडीराम आवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मिरज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, मुलगा, सून, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कृष्णा घाट स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रक्षाविसर्जन गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कृष्णा घाट स्मशानभूमी येथे होणार आहे.धोंडीराम आवळे यांनी मिरजेत अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावली. फाटक हॉस्पिटल आणि जोशी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून कार्य करत त्यांनी रुग्णसेवेत मोलाचे योगदान दिले. सामाजिक कार्याबरोबरच ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही परिचित होते.मिरजेचे माजी आमदार स्वर्गीय एन. आर. पाठक यांचे ते कट्टर समर्थक होते.
काँग्रेस पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
