हलगीच्या गजरात साताऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण.

Spread the love

हलगीच्या गजरात साताऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची उपस्थिती; शाहू चौक घोषणांनी दुमदुमला

दैनिक वृत्तवेग सातारा:- साताऱ्यातील ऐतिहासिक शाहू चौक रविवारी हलगी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजीने दणाणून गेला, निमित्त होते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भव्य अनावरण सोहळ्याचे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दिमाखदार वातावरणात पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.पुतळ्याचे अनावरण होताच शाहू चौकात जल्लोष उसळला.

हलगीचा कडकडाट, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि “अण्णा भाऊ साठे अमर राहो”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी उभे राहून लोकशाहीरांना अभिवादन केले.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अमित गोरखे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री हेलिपॅडवरून थेट शाहू चौकात दाखल झाल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. अण्णा भाऊ साठे कृती समितीच्या वतीने सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून मान्यवरांचे पारंपरिक स्वागत करण्यात आले.

त्यानंतर मान्यवरांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत स्मरणीय छायाचित्रेही काढली.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांनाही अभिवादन केले.

“अण्णा भाऊंची लेखणी ही जनतेचा आवाज”

यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीतून समाजातील वंचित, कष्टकरी आणि गरिबांचा आवाज बुलंद केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या लेखणीने क्रांतीची मशाल पेटवली. सातारा नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी उपस्थित राहण्याचा मला विशेष आनंद होत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *