धोंडेवाडी ग्रामपंचायतीला धाडसी आणि पावरफुल सरपंचाची गरज – संभाजी साठे

Spread the love

धोंडेवाडी ग्रामपंचायतीला धाडसी आणि पावरफुल सरपंचाची गरज – संभाजी साठे

दैनिक वृत्तवेग

पंढरपूर प्रतिनिधी :

धोंडेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावाच्या विकासासाठी धाडसी, अभ्यासू आणि प्रशासकीय योजनांची सखोल माहिती असलेला सरपंच निवडला जाणे गरजेचे असल्याचे मत पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष संभाजी साठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

गावचा सरपंच हा कुठल्याही दबावाला न घाबरणारा, गावातील प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे मांडणारा आणि विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारा असावा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गावात नवीन योजना आणणे, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न शासन दरबारी मांडणे, तसेच ग्रामस्थांना बँकांचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे, या गुणांचा सरपंचामध्ये समावेश असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मागील सरपंचांनी त्यांच्या परीने चांगले काम केले असले तरी काही महत्त्वाची विकासकामे अद्याप अपूर्ण असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

विशेषतः जलजीवन मिशन अंतर्गत धोंडेवाडी पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम गेली दोन वर्षे रखडल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.या संदर्भात माजी सरपंच बंडू भाऊसाहेब यांनी सातत्याने पाठपुरावा केला असूनही ग्रामसेवक आणि ठेकेदार यांच्यात काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. प्रांत अधिकारी आणि बीडीओ यांच्याकडे विचारणा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ग्रामसेवकांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.जलजीवन मिशनचे काम दोन वर्षे प्रलंबित का ठेवले, याचे उत्तर धोंडेवाडी ग्रामस्थांना मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत लवकरच विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून ग्रामसेवक, बीडीओ आणि संबंधित ठेकेदारांची चौकशी करून कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या समस्या तत्काळ सोडवणारा, विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवणारा आणि गावाच्या हितासाठी ठाम भूमिका घेणारा सरपंचच धोंडेवाडीच्या विकासाला गती देऊ शकतो, असेही संभाजी साठे यांनी शेवटी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *