सावळी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्वच्छता उपक्रमाचा प्रेरणादायी सोहळा संपन्न“सोशल मीडियाच्या चुकीच्या गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे”-सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांचे प्रतिपादन

Spread the love

सावळी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्वच्छता उपक्रमाचा प्रेरणादायी सोहळा संपन्न

“सोशल मीडियाच्या चुकीच्या गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे”-सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांचे प्रतिपादन

दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे

सावळी गावातील “दीप फाउंडेशन”च्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तसेच लोकवर्गणीतून साकारण्यात आलेल्या १६ कचराकुंड्यांच्या समर्पण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सन्मती गणे उपस्थित होत्या. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक इनामदार, तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद चौगुले, पोलीस पाटील अंकुश कांबळे, तसेच सावळी गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे म्हणाले की, “आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियातील चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावे. कष्टाला पर्याय नाही. आई-वडील हेच खरे आदर्श आहेत. भाईगिरीचे आकर्षण तात्पुरते असते, मात्र त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतात.”सावळीसारख्या छोट्या गावात सामाजिक बांधिलकी जपत “दीप फाउंडेशन”ने आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात दहावी-बारावीतील सुमारे ७० गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शासकीय सेवेत भरती झालेल्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा फेटे बांधून, प्रमाणपत्र, झाड, वह्या आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि अभिमान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.तसेच पीएचडी प्राप्त केलेल्या सौ. कविता कुपवाडे, मा. रवी कुपवाडे आणि डॉ. वैभव डोंगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उद्धव भोसले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

गावातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून १६ कचराकुंड्यांची उभारणी करण्यात आली असून पुढील काही दिवसांत गावातील रस्त्यांच्या कडेला व मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता दूत दिनकर पवार यांनी दिली.कार्यक्रमाचे स्वरूप पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी संविधान फाउंडेशनचे अमर बनसोडे (यशवंत नगर) यांच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठी ३ हजार रुपयांची देणगी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल दीप फाउंडेशन आणि दिनकर पवार टीमच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

या उपक्रमासाठी सावळी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी लोकवर्गणीतून आर्थिक सहकार्य केले. सामाजिक कार्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या निस्वार्थ सहकार्याबद्दल स्वच्छता दूत दिनकर पवार व टीमने सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना हलवाई (मिरज) यांनी केले तर प्रस्तावना अर्जुन सावंत सर यांनी मांडली.शेवटी प्राध्यापक लक्ष्मण मोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *