
राधाकृष्ण विखे-पाटील यांचे शिर्डीत वक्तव्य.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:
मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर बजेटनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात २,१०० रुपये जमा होणार असल्याचे वक्तव्य राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये दिले जातील, असे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर, विखे-पाटील यांनी लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगितले.शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे-पाटील यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केले आहे.
या योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ तारखेपूर्वीपासून मिळण्यास सुरू होईल, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच दिली होती.
निकषांत न बसणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’कडून रक्कम परत घेणार
सरकारची स्वतःची स्वतंत्र पडताळणी व्यवस्था आहे. त्यांतर्गत आम्ही परिवहन विभागाशी समन्वय साधून काम करत आहोत. ज्या महिलांनी निकषांत बसत नसतानाही या योजनेचा लाभ घेतला, त्यांच्या अर्जाची पडताळणी स्वतंत्र व्यवस्थेद्वारे केली जाईल.विशेषतः, ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहत आहेत. तसेच, गेल्या पाच महिन्यांत ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे, त्यांची यादीही या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल. त्यामुळे निश्चितच अशा महिलांकडूनही पैसे परत घेतले जातील.महिलांनी स्वतःहून पुढे यावे.चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतः हुन पुढे येऊन आपले अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.