
मिरज मतदारसंघासाठी १६२.४८ कोटींचा विकास निधी मंजूर-आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांची माहिती
दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
मिरज, दि.-मिरज मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून एकूण १६२ कोटी ४८ लाख २९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी दिली. ते मिरज येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.या मंजूर निधीतून मिरज मतदारसंघात विविध महत्त्वाची विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.
यामध्ये राज्य मार्ग (SH) व प्रमुख जिल्हा मार्ग (MDR) रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा, मौजे लिंगनूर येथील श्री यल्लमा देवी मंदिर परिसरात भक्त निवास (तळ व पहिला मजला), सभामंडप, टॉयलेट ब्लॉक, पेव्हिंग ब्लॉक, काँक्रीट रस्ते व विद्युत रोषणाई आदी कामांचा समावेश आहे.तसेच, मिरज शहरातील किसान चौक येथे १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारण्यात येणार आहे. कृष्णा-कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेद्वारे आरग, बेडग, नरवाड, लक्ष्मीवाडी येथील वंचित क्षेत्रांना ओलीताखाली आणण्याचे कामही करण्यात येणार आहे. याशिवाय बनेवाडी उपसा सिंचन योजनेतून बंदिस्त पाइपलाईनद्वारे भोसे लघु पाटबंधारे तलावात कायमस्वरूपी पाणी भरण्याची योजना राबवली जाणार आहे.मालगाव, टाकळी, बोलवाड, बेडग, नरवाड, म्हैसाळ व वड्डी या सात गावांना उपसा सिंचन योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.
तसेच मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे १०० विद्यार्थ्यांसाठी नवीन नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे.नागरी दलितेतर योजनेअंतर्गत मिरज शहरातील प्रभाग क्र. ३ मधील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण तसेच मिरज एमआयडीसी परिसरातील रस्त्यांचेही काम करण्यात येणार आहे.यावेळी आमदार खाडे यांनी सांगितले की, “मिरज मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून, याबाबत कोणालाही शंका असल्यास त्यांनी शासनाचा जीआर तपासून खात्री करावी.
सर्व मंजूर निधीची कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत.”दरम्यान, मिरज पंचायत समितीतील निवड प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपचे संख्याबळ असतानाही चुकीच्या पद्धतीने निवड झाली असून याबाबत संबंधित विभागामार्फत चौकशी सुरू आहे. लवकरच मिरज पंचायत समितीत भाजपचाच सभापती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.