कन्या सबलीकरण उपक्रमातून 15 हजार 508 विद्यार्थिनी यलो बेल्टधारक

Spread the love

कन्या सबलीकरण उपक्रमातून 15 हजार 508 विद्यार्थिनी यलो बेल्टधारक

दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे

सांगली : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कन्या सबलीकरण उपक्रमातून शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत असून या उपक्रमातून जिल्ह्यातील 15 हजार 508 विद्यार्थिनींनी यलो बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मुलींमध्ये आत्मरक्षणाची क्षमता, अनुशासन, संयम आणि निर्णयक्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.सांगली जिल्ह्यातील कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत आयोजित सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमातील विद्यार्थिनींना यलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. दीपायन बँक्वेट हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, कराटे प्रशिक्षणामुळे मुलींना आत्मविश्वासाचे कवच मिळते आणि त्यातून खऱ्या अर्थाने कन्या सबलीकरण साध्य होते. यलो बेल्ट मिळवलेल्या 15 हजार विद्यार्थिनींपैकी किमान एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थिनींनी ब्लॅक बेल्ट मिळवण्यापर्यंत मजल मारावी. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी प्रशासनिक कामांसोबत सामाजिक उपक्रमांवर भर देत मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य समीत कदम, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अंजली पाटील, शरदिनी काकडे, निवासी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 51 शाळांमधील 38 हजार 600 विद्यार्थिनींना मोफत कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण देण्यात आले. गत आठवड्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यापैकी 15 हजार 508 विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन यलो बेल्ट मिळविण्यात यशस्वी ठरल्या.तायक्वांदो संघटनेचे प्रमुख सुरेश चौधरी आणि कराटे संघटनेचे प्रमुख हमजेखान मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *