
मिरज पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता; सभापतीपदी तन्वी कमलेकर, उपसभापतीपदी ललिता शेजुळ
दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांनी बाजी मारत भाजपला धक्का दिला आहे. सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजुळ यांची निवड झाली.दोन्ही उमेदवारांनी अकरा विरुद्ध दहा मतांनी विजय मिळवला. सभापतीपदाच्या निवडणुकीत तन्वी कमलेकर यांनी भाजपच्या राणी भोरे यांचा पराभव केला. तर उपसभापती पदाच्या निवडणुकीत ललिता शेजुळ यांनी भाजपचे पांडुरंग पाटील यांचा पराभव केला.

दरम्यान, मतदानाच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे सदस्य पांडुरंग इंगळे अनुपस्थित राहिल्याची नोंद झाली.या निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची साथ मिळाल्याने भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेना शिंदे गट या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या निकालामुळे मिरज पंचायत समितीत काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी गट आणि शिवसेना एकत्र सत्तेत आले असून भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
