
माणुसकीचा आदर्श : नगरसेवक सागर वनखंडे यांनी हरवलेल्या वृद्धास कुटुंबाशी केली पुनर्भेट
दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे
मिरज प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक मा. सागर मोहन वनखंडे यांनी माणुसकीचे उदाहरण घालत रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत आढळलेल्या हरवलेल्या वृद्ध व्यक्तीस त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचवण्याचे काम केले.
माहितीनुसार, नगरसेवक वनखंडे हे अष्टविनायक परिसरातील एका कार्यक्रमासाठी जात असताना रस्त्याच्या कडेला एक वृद्ध व्यक्ती बसलेली दिसली. त्या व्यक्तीची अवस्था अत्यंत गंभीर होती. अंगावर फाटके कपडे असून ते व्यवस्थित बोलू शकत नव्हते. ते वारंवार “वसगडे” या त्यांच्या गावाचे नाव घेत होते.त्यांची अवस्था पाहून नगरसेवक वनखंडे यांनी तात्काळ त्यांच्या बाबत चौकशी सुरू केली.






वसगडे गावातील काही ओळखीच्या नागरिकांना फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला; मात्र सुरुवातीला कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी तासगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
तासगाव पोलिसांनी वसगडे हे भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याची माहिती देत भिलवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.यानंतर भिलवडी पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल जाधव यांच्याशी संपर्क साधून नगरसेवक वनखंडे यांनी त्या वृद्ध व्यक्तीचा फोटो पाठवला. फोटो पाहिल्यानंतर “हजारे” नावाच्या व्यक्तीबाबत हरवल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून फोटोद्वारे त्या वृद्धाची ओळख निश्चित केली.
सदर वृद्ध व्यक्ती पूर्वी मिरज येथे काम करत असल्याचे समोर आले. ते चालत चालत या परिसरात आले होते. मागील दोन दिवसांपासून ते हरवले होते आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू होता. नगरसेवक वनखंडे यांनी दिलेल्या माहितीनंतर संबंधित नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीस सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले.दोन दिवसांपासून हरवलेल्या व्यक्तीची सुखरूप भेट झाल्याने कुटुंबीयांनी नगरसेवक वनखंडे यांचे आभार मानले. या घटनेमुळे समाजात माणुसकी आणि संवेदनशीलतेचा आदर्श पाहायला मिळाला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया :“रस्त्याच्या कडेला बसलेल्या त्या आजोबांची अवस्था पाहून त्यांना मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असे वाटले. पोलिसांच्या सहकार्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवता आले, याचा मला आनंद आहे.”—–मा.सागर मोहन वनखंडे,नगरसेवक, प्रभाग क्र. ३, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
