
दैनिक वृत्तवेग न्युज नेटवर्क:
सांगली : कृष्णा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या जाळ्यात मगरीचे पिलू अडकले. त्याने ते पिलू सातशे रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. हा सारा प्रकार सांगलीवाडीत घडला. नागरिकांनी त्या तरुणाला चोप देत मगरीचे पिलू ताब्यात घेतले. वन विभागाच्या भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगलीवाडीतील एका मंदिराजवळ ऊस तोडीसाठी पर जिल्ह्यातून आलेले मजूर राहत आहेत. त्यातील एक तरुण मंगळवारी सायंकाळी नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. त्याच्या जाळ्यात काही मासे आणि मगरीचे पिलू अडकले. त्याने ते मगरीचे पिलू घरी आणले. हे पिलू विकण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याची विचारपूस केली असता बेधुंद अवस्थेत होता. नागरिकांनी त्याला मगरीचे पिलू दाखविण्यास सांगितले. त्याने पिलू दाखविताच नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देत मगरीचे पिलू काढून घेतले.
दरम्यान, काही प्राणीमित्रांनी या घटनेची माहिती माजी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांना दिली. त्यांनी तत्काळ वन विभागाला घटनेची माहिती दिली.वन विभागाचे वनपाल तुषार भोरे, वनरक्षक गणेश भोसले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मगरीचे पिलू ताब्यात घेतले. संबंधिताचा शोधही घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. अखेर मगरीचे पिलू सायंकाळी उशिरा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.