
वाल्मिकी कराड वर मोक्का !बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एस आय टी पोलिसांची कारवाई.
वृत्तवेग न्युज नेटवर्क : दिनांक 14 जानेवारी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंचसंतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड याला आज (मंगळवारी) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.तसेच कराड विरोधात अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोपदेखील एसआयटी (SIT) कडून ठेवण्यात आला आहे. वाल्मिक याच्यावर मोक्का लावण्यात आल्यानंतर पोलीस आता त्याची पुन्हा कोठडी मागणार आहेत. केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी अद्यापही फरार असताना आता या सर्वच ८ आरोपींना याआधीच मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. आता कराड विरोधातही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे हे सध्या अटकेत आहेत. तर कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत.
वाल्मिक कराड कोण आहेत?
वाल्मिक कराड हे मूळचे बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावचे रहिवाशी आहेत. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ते परळीत आले. उपजिविकेसाठी कधीकधी ते जत्रेत सिनेमे दाखवायचे.पुढे गोपीनाथ मुंडेंच्या घरात वाल्मिक कराड घरगडी म्हणून दूध, भाजीपाला, किराणा आणण्याची कामं करू लागले.गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेले.वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक, परळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेता, नाथ प्रतिष्ठानचे सदस्य, बीड जिल्हा स्थायी समिती सदस्य आणि गेल्या १० वर्षापासून परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.बीडमधील पोलीस ठाण्यात खंडणीशी संबंधित गुन्हा वाल्मिक कराड यांच्याविरोधात दाखल आहे.
विस्तृत माहिती
वाल्मिकी कराड हे प्राथमिक शिक्षण पांगरी आणि गाढे पिंपळगाव या गावांमध्ये घेतल्यानंतर, वाल्मिक कराड महाविद्यालयात शिकायला परळीला आले. परळीत आल्यानंतर ते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आले.
गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचा तो काळ होता. त्यावेळी परळीच्या परमार कॉलनीत गोपीनाथ मुंडे भाड्याच्या घरात राहायचे.
गोपीनाथ मुंडेंचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिक कराड यांना मुंडेंच्या घरात कामासाठी आणले. तेव्हापासून वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंच्या घरातील सगळी कामं करू लागले.
जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक ठरली टर्निंग पॉईंट
वाल्मिक कराड यांच्याबाबत सध्या परळीमध्ये फारसं बोललं जात नाही. एवढंच काय सीआयडीकडे आत्मसर्पण केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी देखील त्यांच्याबाबत बोलताना ‘नो कमेंट्स’ असं म्हटलं आहे.
मात्र 1993 -1995 दरम्यान जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा किस्सा मात्र पत्रकार आवर्जून सांगतात.
“त्यावर्षीच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध टी. पी. मुंडे यांच्या पॅनलचा थेट सामना होता. निवडणुकीच्या निकालात गोपीनाथ मुंडे यांचे 7 उमेदवार निवडून आले, तर टी. पी, मुंडेंचे 23 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे अध्यक्ष टी. पी. मुंडेंचा होणार हे स्पष्ट होते. जिंकलेल्या सदस्यांतून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू झाली त्यात तुंबळ हाणामाऱ्या सुरू झाल्या. तेव्हा गोपीनाथरावांच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या मांडीत तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या पिस्तूलातून निघालेली गोळी घुसली.”
या घटनेनंतर वाल्मिक कराड यांच्यावर गोपीनाथ मुंडेंचा विश्वास बसला आणि ते अधिकाधिक मुंडे कुटुंबियांच्या जवळ गेले.
पंडितअण्णा मुंडे यांच्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश
गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करण्यापासून सुरुवात झालेले वाल्मिक कराड यांनी हळूहळू स्वतःचा जम बसवला. दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ पंडितअण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली.
पुढे 2001 साली परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विरोध असतानाही पंडितअण्णा मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना तिकीट दिलं. त्यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.
त्यानंतर वाल्मिक कराड नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले. काहीकाळ परळीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं.
एकीकडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक वाढत गेली, तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध दुरावत गेले.
एका बाजूला राजकारण दुसऱ्या बाजूला ‘अर्थ’कारण
शाळेत असताना वाल्मिक कराड परळीतून व्हीसीआर भाड्याने आणून नाथरा, इंजेगांव आदी गावांच्या जत्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवत.
यात्रेत सिनेमा दाखवणारे वाल्मिक कराड आज जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड, आणि काही खासगी कंपन्यांमध्ये संचालक आहेत. या दोन्ही कंपन्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत.