
‘एका हाताने टाळी वाजत नाही’… १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे दिवशी हे घडू नये; पालकांनी मुलांना समजून घेण्याची काळाची गरज
आजच्या आधुनिक युगात १४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात “व्हॅलेंटाईन डे” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेम व्यक्त करणे, आपुलकी दाखवणे, मैत्री आणि नातेसंबंध मजबूत करणे याला महत्त्व दिले जाते. परंतु आपल्या समाजात, विशेषतः किशोरवयीन मुलामुलींमध्ये या दिवसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा वेगळा आणि संवेदनशील असतो. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व, त्याचा मुलामुलींवर होणारा मानसिक परिणाम आणि पालकांनी घ्यायची काळजी यावर विचार करणे आवश्यक आहे.
व्हॅलेंटाईन डे हा फक्त प्रपोज करण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी दिलेला दिवस आहे असे अनेकांना वाटते. परंतु प्रत्यक्षात हा दिवस केवळ प्रणय व्यक्त करण्यापुरता मर्यादित नाही. प्रेम, आदर, मैत्री, आपुलकी आणि स्नेह यांचे महत्त्व सांगणारा हा दिवस आहे. कुटुंब, मित्र, शिक्षक किंवा समाजातील इतर व्यक्ती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही हा दिवस साजरा केला जाऊ शकतो.
१० वी आणि १२ वी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात. या काळात अभ्यासाचा ताण, करिअरची चिंता आणि भावनिक बदल सुरू असतात. याच वयात आकर्षण, मैत्री आणि प्रेम यासारख्या भावना निर्माण होणे स्वाभाविक असते. परंतु सोशल मीडिया, मित्रपरिवार आणि समाजातील ट्रेंडमुळे काही वेळा मुलामुलींवर कोणाला तरी प्रपोज करावे किंवा रिलेशनशिपमध्ये असावे असा दबाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलाने किंवा मुलीने प्रपोज केले आणि त्याला सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर त्याचा मानसिक परिणाम होऊ शकतो.
काही वेळा मुलामुली त्या गोष्टी मनात ठेवतात. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, आत्मविश्वास कमी होतो आणि मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण होते. किशोरवयात निर्णय घेण्याची परिपक्वता पूर्ण विकसित झालेली नसते, त्यामुळे मुले आणि मुली भावनेच्या ओघात वाहून जातात आणि काही वेळा चुकीच्या गोष्टींमध्ये अडकण्याची शक्यता असते.आपल्या समाजात अजूनही प्रेमसंबंधांविषयी खुलेपणाने बोलले जात नाही. एखाद्या मुलाने प्रपोज केल्यास मुलगी घरी सांगायला घाबरते. “एका हाताने टाळी वाजत नाही” असे समाजातील बोलणे अनेकदा मुलींना दोष देणारे ठरते. त्यामुळे मुलामुलींमध्ये भीती, अपराधीपणा आणि तणाव निर्माण होतो.

आजच्या काळात पालकांनी मुलांवर फक्त दबाव टाकण्याऐवजी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांनी त्यांच्या आयुष्यातील घडामोडी आई-वडिलांना मोकळेपणाने सांगता याव्यात यासाठी घरातील वातावरण विश्वासाचे आणि समजूतदार असावे. पालकांनी मुलांशी मोकळा संवाद ठेवावा, त्यांच्या भावना आणि विचार ऐकून घ्यावेत. अभ्यास किंवा वर्तनाबाबत अति दडपण टाकू नये, कारण त्यामुळे मुले गोष्टी लपवू लागतात. योग्य-अयोग्य याबद्दल शांतपणे समजावून सांगणे, मुलांना नकार किंवा अपयश सहन करण्याची मानसिक ताकद देणे आणि आपल्या संस्कृतीतील कुटुंबव्यवस्था, आदर व जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देणे ही पालकांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस काही लोकांना आपल्या संस्कृतीला शोभणारे वाटत नाहीत. परंतु प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. प्रेम व्यक्त करणे चुकीचे नाही, परंतु त्यासाठी योग्य वय, समज आणि जबाबदारी आवश्यक आहे. पालक, शिक्षक आणि समाज यांनी मुलांना योग्य दिशा दिल्यास आधुनिकतेबरोबर संस्कृती टिकवता येऊ शकते.
व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसून नातेसंबंधातील आदर, विश्वास आणि समज वाढवण्याचा दिवस असू शकतो. किशोरवयीन मुलामुलींना योग्य मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळाल्यास ते चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलांना समजून घेऊन त्यांची मनस्थिती जाणून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रेम, संस्कार आणि संवाद यांचा समतोल राखल्यास समाज अधिक सुदृढ होऊ शकतो.
लेखक-गणेश वायदंडे. दैनिक वृत्तवेग मुख्य-संपादक ९९७५३३९४३९.
