
जागतिक कर्करोग दिनानिमित्त सांगलीत ‘Cycle for Gold’ जनजागृती सायकल रॅली उत्साहात संपन्न.
दैनिक वृत्तवेग सांगली, दि. ४ फेब्रुवारी २०२६ विशेष प्रतिनिधी
जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर CanKids…KidsCan या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने “Cycle for Gold – India’s Largest Charity Cycling Challenge” च्या पाचव्या आवृत्तीअंतर्गत सांगली येथे भव्य समुदाय जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाच्या सहकार्याने ही रॅली यशस्वीपणे पार पडली.ही सायकल रॅली श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल येथून सुरू होऊन श्री गणपती मंदिर, कृष्णा घाट, सांगली येथे समाप्त झाली. सुमारे १३ किलोमीटरचे अंतर पार करत ५० हून अधिक सायकलपटूंनी बालकर्करोगाविषयी जनजागृती, लवकर निदानाचे महत्त्व आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मुलांसोबत एकात्मता, आशा आणि पाठिंबा व्यक्त करणारी ही रॅली ठरली.या रॅलीला मान्यवरांची उपस्थिती लाभली. श्री काशिनाथ मसाळ (कार्यकारी अभियंता, सांगली), डॉ. रियाज मुजावर (हृदयरोगतज्ज्ञ, मिरज) आणि डॉ. विश्वास फडके (अस्थिरोगतज्ज्ञ, सांगली) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग ग्रुपचे सदस्य व इतर मान्यवरांनी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले. यामध्ये श्री मोहन गलांगे, श्री चिंतामणी बोदास, श्री संजय कट्टी, श्री श्रीधर देसाई, श्री चंद्रकांत टेके, श्री पांडुरंग शिंदे, श्री देवेंद्र खोत, श्री धोंडीराम दबाडे, श्री संजय खैरमोडे, श्री शीतल बाबर, डॉ. मंजुश्री फडके आणि कु. गीतांजली गलांगे यांचा समावेश होता.श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलचे प्रशासन विभागप्रमुख श्री मिलिंद कुलकर्णी यांनीही या उपक्रमाला ठोस पाठिंबा दर्शवला.
तसेच जिल्हा परिषद शाळा, मराठी मुलांची शाळा संजयगांधीनगर, मिरज येथील उपमुख्याध्यापक श्री शरद नरदे, शिक्षकवर्ग आणि ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सायकलिंगद्वारे उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याशिवाय ५० व्यावसायिक सायकलपटू व CanKids टीमचे सदस्य रॅलीत सहभागी झाले होते.मान्यवरांनी आपल्या भाषणांतून बालकर्करोग लवकर ओळखल्यास तो मोठ्या प्रमाणात बरा होऊ शकतो, असे नमूद केले.
तसेच वैद्यकीय उपचारांसोबत मानसिक आधार, शिक्षणाची सातत्यता आणि कर्करोगातून बरे झालेल्या मुलांसाठीची पुनर्वसन मदत देणाऱ्या CanKids संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.ही प्रेरणादायी रॅली खऱ्या अर्थाने“Get Fit. Give Hope. Let’s Do Cancer Ko Dishoom Dishoom”या संदेशाचे प्रतीक ठरली असून, एकत्र आलो तर अनेक लहान जीव वाचवू शकतो, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
