कोल्हापूर पोलिसांकडून आंतरराज्य वाहन चोरट्यांची टोळी पकडली.

Spread the love

कोल्हापूर पोलिसांकडून आंतरराज्य वाहन चोरट्यांची टोळी पकडली. साठ लाखांची वाहने केली जप्त, दुचाकी पासून ट्रक पर्यंत चेसेस नंबर प्लेट बदलून केली जात होती विक्री.

कोल्हापूर : बनावट चावीने चोरलेली वाहने कर्नाटकात नेऊन विकणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील दोन सराईत वाहन चोरट्यांसह कर्नाटकातील तिघांकडून पोलिसांनीचोरीतील तीन ट्रक, तीन कार, एक बोलेरो पिकअप आणि पाच दुचाकी अशी सुमारे ६० लाखांची १२ वाहने जप्त केली.

या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.नागेश हणमंत शिंदे (वय ३०, रा. लोकमान्यनगर, कोरोची, ता. हातकणंगले), संतोष बाबासो देटके (४०, रा. तारळे, ता. पाटण, जि. सातारा), मुस्तफा सुफी महंमद (५०, रा. सेकंड क्रॉस, जनता कॉलनी, टुमकुर, जि. बेंगलोर), करीम शरीफ शेख (६४, रा. पी. एच. कॉलनी, टुमकुर) आणि इमामसाब रसुलसाब मुलनवार (४५, रा. कुरटपेटी बेटगिरी, जि. गदग) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. वाहन चोरीतील ही सराईत टोळी असून, त्यांच्यावर महाराष्ट्रासह कर्नाटकात गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेताना अंमलदार रामचंद्र कोळी आणि सुरेश पाटील यांना रेकॉर्डवरील सराईत चोरटा नागेश शिंदे याने काही वाहनांची चोरी केल्याचे समजले होते. तो एका मित्रासह चोरीतील टेम्पो विक्रीसाठी शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सोमवारी (दि. ६) सापळा रचून शिंदे आणि त्याचा साथीदार संतोष देटके याला पोलिसांनी ताब्यात घेतले.टेम्पोबद्दल चौकशी केल्यानंतर तो शिरोली एमआयडीसी येथून चोरल्याची त्यांनी कबुली दिली. अधिक चौकशीत त्यांनी आणखी काही वाहने चोरून कर्नाटकात गदग आणि टुमकुर परिसरात विकल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा छडा लावून कर्नाटकातील तिघांना अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी चोरीतील तीन ट्रक, तीन कार, एक बोलेरो पिकअप आणि पाच दुचाकी जप्त केल्या. अधिक तपास उपनिरीक्षक शेष मोरे करीत आहेत.येथून चोरलेली वाहने या टोळीने शिरोली एमआयडीसी, राजारामपुरी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शाहूपुरी, कागल आणि गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक वाहन चोरले. शिरोळ आणि शहापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून प्रत्येकी दोन वाहने चोरली. तर कुडूवाडी (जि. सोलापूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक वाहन चोरल्याची कबुली दिली.चेसीस, नंबरप्लेट बदलून विक्रीनागेश शिंदे आणि संतोष देटके हे दोघे चोरलेली वाहने कर्नाटकातील गदग आणि टुमकुर येथे घेऊन जायचे. तिथे वाहनांचे चेसिस नंबर आणि नंबर प्लेट बदलून बनावट कागदपत्र तयार केली जायची. त्यानंतर चोरीतील वाहनांची पुढे विक्री केली जात होती.

गेल्या अनेक वर्षांपासून या टोळीने चोरीतील शेकडो वाहने विकली असावित असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती निरीक्षक कळमकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *