रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई; जन आरोग्य अभियानाकडून जिल्हा वरिष्ठ समन्वयक सुभाष नांगरे यांचा सत्कार.

Spread the love

रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई; जन आरोग्य अभियानाकडून जिल्हा वरिष्ठ समन्वयक सुभाष नांगरे यांचा सत्कार

दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे

सांगली जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून रुग्णांची आर्थिक लूट व मानसिक छळ करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात आली आहे. या धाडसी व जनहितकारी कारवाईबद्दल ‘आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियान’ तर्फे योजनेचे जिल्हा वरिष्ठ समन्वयक अधिकारी सुभाष नांगरे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा असताना, सांगली जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांकडून नियमांना हरताळ फासल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. आरोग्य हक्क समितीने पुराव्यासह दाखल केलेल्या तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत चौकशी केली असता दोषी रुग्णालयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या आवारातील रुग्ण हक्क सनद माहिती फलकासमोर गौरव कार्यक्रम पार पडला. समितीचे अध्यक्ष शाहीन शेख यांच्या हस्ते सुभाष नांगरे यांना ‘रुग्ण अधिकार सनद पॉकेट’ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.समितीने दाखल केलेल्या तक्रारींमध्ये मोफत उपचार असतानाही रुग्णांकडून डिपॉझिट मागणे, ऐनवेळी शस्त्रक्रिया करण्यास नकार देणे, रुग्ण व नातेवाईकांशी अपमानास्पद वागणूक देणे तसेच जाचक अटी लावून आर्थिक शोषण करणे, अशा गंभीर बाबींचा समावेश होता.यावेळी बोलताना शाहीन शेख म्हणाले, “सामान्य रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुग्णालयांवर झालेली कारवाई स्वागतार्ह आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आरोग्य हक्क समिती खंबीरपणे उभी राहील.

”कार्यक्रमास समितीचे आरोग्यदूत राजेंद्र माळी, इलियास शेख, मनीषा माळी, राहीद शेख, धुळा पांढरे, प्रमोद माळी, राजेश साळुंखे, प्रदीप उर्फ चंदू पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *