
सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीस गेलेली स्प्लेंडर दुचाकी एक वर्षानंतर इचलकरंजी येथे सापडली
दैनिक वृत्तवेग प्रतिनिधी सांगली
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून एक वर्षापूर्वी चोरीस गेलेली स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक MH 09 EP 2623) अखेर इचलकरंजी येथे सापडल्याने वाहन मालकास दिलासा मिळाला आहे. ही कारवाई सांगली शहर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे केली आहे.या दुचाकी चोरीप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान संशयित आरोपीकडून सदर दुचाकी हस्तगत करण्यात आली असून, चोरीनंतर आरोपीकडून ही दुचाकी विविध ठिकाणी वापरात आणली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून दुचाकी जप्त केली. दुचाकीची पाहणी करून आवश्यक पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाई सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक एस. एस. भालेराव, तपास अधिकारी आर. आर. मॅडम तसेच लिपिक अतुल खंडागळे यांच्या प्रयत्नातून पार पडली. तसेच इचलकरंजी येथे दुचाकी सापडल्याची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पवन गुरव यांनी तात्काळ वाहन मालकाला फोन करून याबाबतची माहिती दिली.
सदर दुचाकीचे मालक बाळकृष्ण रामचंद्र घबाडे (रा. कोल्हापूर) यांची कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दुचाकी त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. गाडी मिळाल्यानंतर पत्रकार पंडित तारळे यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.दरम्यान, या प्रकरणातील आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अधिक तपास सांगली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.
