
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान नागरी रस्ता बोगदा प्रकल्प विकसित करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-मुंबई.
मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान नागरी रस्ता बोगदा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि पूरक उपाययोजना करण्यात येत आहे. या प्रकल्पास अधिक गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.
