कर्मकांडाला फाटा देत बागणीत सत्यशोधक पद्धतीने रक्षा विसर्जन.

Spread the love

कर्मकांडाला फाटा देत बागणीत सत्यशोधक पद्धतीने रक्षा विसर्जन…

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क-

        बागणी येथील शाहीर बापू वारे यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या वारे कुटुंबियांनी हजारो वर्षापासून चालत आलेल्या पारंपरिक कर्मकांडांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने रक्षा विसर्जन व दशक्रिया विधी केला. 

     बागणी येथील शाहीर बापू वारे हे प्रसिद्ध शाहीर होते. ते सुप्रसिद्ध शाहीर रमजान बागणीकर यांचे शिष्य होते.  महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यात शाहिरीचे व सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल राज्यस्तरीय "समाजभूषण" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच ते वारकरी संप्रदायातही सक्रीय होते. त्यांचे वृद्धापकाळाने बुधवारी निधन झाले. त्यांचा रक्षा विसर्जन व दशक्रिया विधी कर्मकांड टाळून सत्यशोधक पद्धतीने करण्याचा निर्णय त्यांचे सुपुत्र सदाशिव वारे, सचिन वारे आणि संपूर्ण वारे परिवाराकडून घेण्यात आला. हजारो वर्षांची परंपरा मोडीत काढून निसर्गाची पूजा यावेळी करण्यात आली. 

     हा सत्यशोधक विधी करोली एम चे सामाजिक कार्यकर्ते मा. ए. डी. पाटील यांनी केला. ए . डी. पाटील यांनी हा विधी करण्यापूर्वी सर्व उपस्थितांचे प्रबोधन केले. पारंपारिक विधी हे कसे कालबाह्य आहेत, बहुजन समाजास कसे  नुकसानकारक आहेत याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कावळा शिवणे, मुलांचे केशवपन, अस्थी व रक्षा नदीला वाहणे, आईच्या बांगड्या फोडणे, आभूषणे काढणे, कुंकू पुसणे इ. प्रकार टाळण्यात आले. 

       रक्षा व अस्थिंचे नदीत विसर्जन न करता वारे परिवाराच्या वतीने आपल्या शेतात खड्डा काढून त्यात त्यांचे विसर्जन केले व उपस्थितांच्या हस्ते त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. दशक्रिया विधीवेळी महात्मा जोतीराव फुले यांच्या खंडांचे वाचन करून त्याबाबत निरूपण केले. पृथ्वी, सूर्य, वृक्ष इत्यादींची निसर्गपुजा करण्यात आली. भावाबहिणींनी एकोप्याने राहण्याचा संकल्प केला. यावेळी उपस्थित महिला वर्गाचे प्रामुख्याने प्रबोधन करण्यात आले. या अनिष्ट रुढींचा वाहक हा प्रामुख्याने महिला वर्ग असून त्यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचे, कार्याचे वाचन करावे. सजग व्हावे. जिजाऊ यांनी स्वतः सती जाण्यास विरोध करून स्वराज्य निर्मितीमध्ये मोठे योगदान त्यांनी दिले.

     आजच्या महिलांनी या अनिष्ट रूढी झुगारून आपले सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने करावेत किंबहुना आपल्या मृत्यूपश्चात आपल्या कुटुंबाकडून असे सत्यशोधक विधी केले जावेत असे इच्छापत्र सर्व स्त्री पुरुषांनी अगोदरच करून ठेवावे असेही ते म्हणाले. खास करून आजच्या महिलांनी विज्ञानवादी विचार आचरणात आणल्यास आणि ते पुढच्या पिढीला दिल्यास बहुजन समाजात परिवर्तन नक्की होईल असे ते म्हणाले. यावेळी सत्यशोधक डॉ. विजय गायकवाड यांनीही या विधीचे काम पाहिले. 

     दरम्यान वारे परिवारास सांत्वनपर भेट देण्यासाठी उपस्थित असलेले बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम, आमदार जयंत पाटील, शिक्षणाधिकारी मा. मोहन गायकवाड, मा. रंगराव आठवले, ॲड. शिवाजीराव घाटगे इ. मान्यवरांनी वारे परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या या सत्यशोधक पद्धतीचे कौतुक केले. सर्व बहुजन समाजाने याप्रमाणे वाटचाल करण्यासंदर्भात सर्वांनी इच्छा व्यक्त केली. 

    यावेळी बामसेफ, प्रोटान व सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सर्व शिक्षक संघटना, शाहिरी संघटना, शिक्षण विभाग यांचे प्रतिनिधी, सत्यशोधक परिवार, नातेवाईक, शिक्षक, ग्रामस्थ, इ. उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *