
दैनिक वृत्तवेग न्युज नेटवर्क:-
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातून मिरज शहर पोलिसांनी संचलन केले. यावेळी महाराणा प्रताप चौकात दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक करण्यात आले.शहरात आगामी काही दिवसात गुढीपाडवा, रमजान ईद, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलिस सज्ज झाले आहेत. त्यामुळे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मिरजेतून संचलन केले. हे संचलन मिरज शहर पोलिस ठाणे ते महाराणा प्रताप चौक, सराफ कट्टा, गणेश तलाव, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, ब्राह्मणपुरी ते पुन्हा लक्ष्मी मार्केट परिसरापर्यंत करण्यातआले.
या संचलनामध्ये मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वात मिरज शहर, महात्मा गांधी चौक, कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते.
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कोणीही सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच धार्मिक भावना दुखावतील अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर करू नये. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. -किरण रासकर, पोलिस निरीक्षक, मिरज शहर पोलिस ठाणे.
