रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

Spread the love

रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:

महाराष्ट्रही वीरांची, थोरांची भूमी… छत्रपती शिवाजी महाराज ते अगदी अण्णा भाऊ साठेंपर्यंत ही नामावली आहे. अण्णा भाऊ साठेंनी छत्रपती शिवरायांची महती अगदी परेदशात गायली. त्याचा संदर्भ…

प्रथम मायभूमीच्या चरणा ।

छत्रपती शिवबा चरणा ।

स्मरोनी गातो कवना ॥

या ओळी आहेत अण्णा भाऊ साठेंच्या पोवाड्यातील. १९६१-६२ चा काळ होता तो. रशियाला ‘इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटी’च्या आमंत्रणानिमित्ताने अण्णांचा रशिया प्रवास झाला. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी रशियाचे राष्ट्रप्रमुख, अध्यक्ष, मंत्रिमंडळ, प्रमुख मुत्सद्दी, लाखो रशियन शिवप्रेमी जनतेसमोर मॉस्कोच्या भव्य लेनिन चौकात छत्रपती शिवरायांच्या चरित्राचे पोवाड्याच्या माध्यमातून गायन केले. अण्णांना रशियन भाषा येत नाही आणि रशियन लोकांना अण्णांची भाषा येत नाही, अशा परिस्थितीत रशियन भाषेत पोवाड्याचा अनुवाद दुभाषी रशियन जनतेला समजावून सांगत होता. अण्णांच्या वीररसपूर्ण हावभाव व शिवरायांचा पराक्रम ऐकून रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्राध्यक्षांनी अण्णा भाऊंना व्यासपीठावर जाऊन मिठी मारली व ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी रशियन भाषेत घोषणाच दिली. याचा परिणाम असा की, भारताचे पहिले पंतप्रधान रशियाच्या भेटीवर गेले असता रशियाचा प्रत्येक नेता प्रत्येक चर्चेत शिवरायांचा आवर्जून उल्लेख करीत होता. त्यामुळे नेहरू हादरूनच गेले व त्यांनी सहजच प्रश्न विचारला, “तुम्ही रशियन लोक शिवरायांच्या चरित्राचा एवढा अभ्यास कसा करता?” त्यावेळी रशियन नेत्यांनी अण्णा भाऊ साठेंच्या नावाचा उल्लेख केला. नेहरूंना सहजच वाटले की, साठे म्हणजे कुणीतरी आपलाच जातभाई यांना गुरू लाभलेला असावा, म्हणून नेहरूंनी यशवंतरावांना रशियाहून फोन केला व साठेंना शोधून ठेवायला व दिल्लीला भेटायला बोलावून घ्यायला सांगितले. यशवंतरावांनी अण्णा भाऊ साठेंना शोधून नेहरू भेटीचा निरोप दिला. अण्णा भाऊंनी जे बाणेदारपणे उत्तर दिले ते असे, “यशवंतराव, मी काही नेहरूंचा साठे नाही नेहरूंच्या भेटीला यायला. मी शिवरायांच्या मावळा आहे, नेहरूंना माझ्या भेटीची एवढीच ओढ असेल, तर त्यांनी मला भेटण्यासाठी माझ्या या झोपडीत आलं पाहिजे.”असे कणखर अण्णाभाऊ होते.रशियाला शिवराय समजवण्यात अण्णा भाऊंचा मोठा हातभार आहे.

छत्रपती शिवरायांचा विचार आणि १९६० सालाची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याचा मेळ घालण्याचे काम अण्णा भाऊंनी आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून धारवाड बेळगावसह महाराष्ट्रभर अण्णांची हलगी गाजत आणि वाजत राहिली. महाराष्ट्रातील गाव-गल्लीत, खेड्यापाड्यात, शहर-नगरात ‘एक व्हा, नेक व्हा’ हा शिवरायांचा नारा देत संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा संकल्प गावागावात देत राहिली. शिवरायांनी १२ मावळ प्रांतांतून हिंदवी स्वराज्याची शपथ देऊन स्वतःच स्वराज्याचे अस्तित्व सिद्ध केले. त्याच विचारांच्या पुढच्या पिढीचे वारसदार म्हणजे अण्णा. त्यांनी आपल्या लेखणीतून एक रचना साकारली त्यात ते म्हणतात, ‘जग बदल घालून घाव’ हा शिवरायांचाच विचार नव्हता का?

‘तमाशा’ त्या काळातील लोकमनोरंजनाचे महत्त्वाचे माध्यम. तमाशाची सुरुवात ही गणाने होते आणि या गणामध्ये श्री गणेश वंदना आहे. त्या गणेशाच्या जागी साक्षात छत्रपती शिवरायांना विराजमान करून आद्यपूजनाच्या मान दिला आणि गण लिहून काढला.

प्रथम मायभु चरणा

छत्रपती शिवबा चरणा ।

स्मरोनी गातो कवना॥

आणि त्यानंतर स्वातंत्र्यासाठी ज्यांचे योगदान होते, त्यांना आपल्या कवनात मान दिला. मग ते टिळक असो की बाबासाहेब. पण चळवळीच्या आद्यपूजेचा मान हा शिवरायांना देण्याचा प्रवास अण्णांनी सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *