
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटेंचा दणका; सांगलीतील, मिरज येथे निर्मल हॉस्पिटलचा पर्दाफाश, ३ महिन्यांनंतर तरुणाची सुटका.
दैनिक वृत्तवेग विशेष प्रतिनिधी सांगली
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे असलेल्या निर्मल हॉस्पिटल व व्यसन मुक्ती केंद्रात एका तरुणाला थकलेल्या बिलाच्या कारणावरून तब्बल तीन महिने बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणाची सुटका केली.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाला व्यसनमुक्तीसाठी या केंद्रात दाखल करण्यात आले होते.
उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, केंद्राच्या व्यवस्थापनाने रुग्ण पूर्ण बरा झालेला नसल्याचे सांगत त्याला डिस्चार्ज देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, उपचारांच्या बिलाची रक्कम वाढत जाऊन सुमारे ४ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे, गेल्या दीड महिन्यांपासून रुग्णाच्या कुटुंबीयांना त्याची भेट घेण्यासही मनाई करण्यात आली होती.
परिस्थिती गंभीर बनल्याने हतबल कुटुंबीयांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर मंगेश चिवटे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह केंद्रावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला.
कायद्याचा धाक दाखवत त्यांनी रुग्णाला तात्काळ मुक्त करण्यास भाग पाडले.या कारवाईदरम्यान, गरीब रुग्णांची अडवणूक करणे अमानुष असल्याचे सांगत चिवटे यांनी संबंधितांवर संताप व्यक्त केला. “गरीबांच्या अडचणींचा गैरफायदा घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा सविस्तर व्हिडिओ मंगेश चिवटे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर देखील प्रकाशित केला असून, त्यामध्ये कारवाईची संपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष दृश्ये पाहायला मिळत आहेत.तीन महिन्यांनंतर आपल्या मुलाची सुटका झाल्याने आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
या घटनेनंतर सांगली जिल्ह्यातून तसेच सोशल मीडियावर मंगेश चिवटे आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.
