
सांगलीत गॅस तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची लूट; ‘गॅस ग्राहक कृती समिती’ आक्रमक
दैनिक वृत्तवेग प्रतिनिधी सांगली मनोज कांबळे
सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील वारणाली रोड व विद्यानगर कॉलनी भागात गॅस तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही अज्ञात व्यक्ती स्वतःला मिरज येथील मे. श्री धनराज गॅस एजन्सीचे अधिकारी असल्याचे सांगत घरोघरी फिरत असून, “गॅस तपासणी बंधनकारक आहे” असे सांगून प्रत्येक ग्राहकाकडून सक्तीने २३६ रुपये वसूल करत आहेत.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दुरुस्तीच्या नावाखाली अधिक पैसे उकळले जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस टंचाईची भीती असताना अशा प्रकारे ग्राहकांची लूट होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘गॅस ग्राहक कृती समिती’ने जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली यांना निवेदन देत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.

संबंधित तपासणी मोहीम अधिकृत आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, तसेच पैसे वसूल करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.समितीने याप्रकरणी ‘जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत’ कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, सामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण थांबवण्यावर भर दिला आहे. निवेदन स्वीकारून प्रशासनाने यावर लवकरच कारवाईचे आश्वासन दिले आहे.
यावेळी समितीचे योगेश रोकडे, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रमोद माळी, प्रकाश घाडगे, प्रकाश कोत्याळ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
