मिरजेत बनावट फायनान्स एजंटांनी केली लूट; चौघांना अटक

Spread the love

मिरजेत बनावट फायनान्स एजंटांनी केली लूट;

चौघांना अटक,वाहन जप्तीची धमकी देत ८ हजार उकळले, सव्वादोन लाखांच्या दुचाकी जप्त.

मिरज : दैनिक वृत्तवेग

खासगी फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्याचे खोटे कारण सांगून वाहनधारकाला धमकावत ८ हजार रुपये उकळणाऱ्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी विपुल किशोर भोरे (२५, रा. स्फूर्ती चौक, सांगली), अलोक परशुराम वायदंडे (१९, रा. तानंग, ता. मिरज), मयुरेश दीपक मोटे (२०, रा. संजयनगर, सांगली) आणि राजू मनीष परिहार (३०, रा. सर्वोदय पार्किंग यार्ड, मिरज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वादोन लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

फिर्यादी शीतलकुमार माने हे २१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथून मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बहिणीस घेऊन येत होते. मिरज जवळ आल्यानंतर चौघांनी त्यांची दुचाकी अडवली. फायनान्स कंपनीचे हप्ते थकले असल्याचे सांगून गाडी जप्त करून पार्किंग यार्डमध्ये लावण्याची धमकी देण्यात आली. तसेच गाडी सोडवण्यासाठी १२ हजार रुपये मागण्यात आले.यानंतर संशयितांनी दुचाकीच्या नंबर प्लेटची मोडतोड केली आणि दबाव टाकून ऑनलाईन ८ हजार रुपये उकळले.

या घटनेनंतर माने यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासादरम्यान खासगी फायनान्स कंपनीकडून वाहन जबरदस्तीने जप्त करण्याचा कोणताही अधिकार नसताना संशयितांनी फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली.

धमक्यांना बळी पडू नका; ‘११२’ वर तक्रार कराफायनान्स कंपनीचे हप्ते थकले म्हणून कोणालाही वाहन जबरदस्तीने ओढून नेण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असून नागरिकांनी सतर्क राहावे. कोणी अशा प्रकारे धमकावत असल्यास तातडीने ‘११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *