
सांगली शांतीनगर येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
दैनिक वृत्तवेग प्रतिनिधी :
लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता आणि जनसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक लोकमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शांतीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. सत्यशोधक वाचनालय व शांतीनगर व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जयंतीनिमित्त ३१ मे रोजी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस लेखणीपुत्र, शिव उद्योग सहकार सेना सांगली जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना नेते कुलदीप देवकुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.

यावेळी बोलताना देवकुळे यांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आजच्या समाजासाठी प्रेरणेचा अखंड झरा असल्याचे सांगितले. त्यांच्या जयंतीनिमित्त वाचनालय, व्यायाम मंडळ आणि आरोग्य शिबिर यांसारखे विधायक उपक्रम राबविणे हीच त्यांच्या विचारांना खरी मानवंदना असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे नेते प्रशांत भाऊ सदामते यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. तसेच सत्यशोधक वाचनालय व शांतीनगर व्यायाम मंडळाचे सर्वेसर्वा आकाश तिवडे (मेजर) यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या वाचन संस्कृती, युवकांचे शारीरिक सक्षमीकरण आणि सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजू दादा बन्ने तसेच माजी नगरसेविका शेवंताताई वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गजू दादा बन्ने यांच्या हस्ते महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या आरोग्य शिबिराला खणभाग व शांतीनगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जनकल्याणाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.यावेळी किरणराज कांबळे, तानाजी केंचे, गोविंदा घाडगे, गणेश कांबळे, सचिन केंचे, कुंदन केंचे, विवेक मोहिते, दीपक लोंढे, शुभम मोहिते, कुमार आवळे, इसाक केंचे, विनीत मोरे, ओम मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जितेंद्र हेगडे यांनी केले.
