सावळीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे खिंडार; लोकनियुक्त सरपंचांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

Spread the love

सावळीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे खिंडार; लोकनियुक्त सरपंचांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे

सावळी, ता. मिरज :

सावळी गावातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठे खिंडार पडले आहे. दिनांक ३० मे रोजी मिरजेचे कार्यसम्राट आमदार व माजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सावळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सन्मती कुबेर गणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे, सौ. धर्मप्रिया कांबळे, सौ. कल्पना शिंदे, माजी सोसायटी चेअरमन कुबेर गणे, माजी सरपंच श्रीकांत डोंगरे तसेच सोसायटी संचालक श्रीपती शिंदे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून गावातील राजकीय वातावरण ढवळून काढले. या प्रवेशामुळे सावळी गावात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे आमदार डॉ. सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्वागत करत पक्षवाढीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.मिरज तालुका उपाध्यक्षपदी दीपक कारंडे, परशुराम बंडगर आणि जालिंदर माने यांची निवड करण्यात आली.

आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जयश्रीताई पाटील, स्वातीताई खाडे, नीताताई केळकर, नगरसेविका स्वाती शिंदे, प्राजक्ता कोरे तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.या प्रवेश सोहळ्यामुळे सावळी गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपले संघटन अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कार्यक्रमास भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *