
अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी जागा निश्चित.
नातू सचिन साठे यांची माहिती- लवकरच काम सुरू होणार.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
सांगली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव (ता.वाळवा) येथे जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारकासाठी वाटेगावपासून जवळच बापू तलाव परिसरात पाच एकर जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे लवकरच अण्णा भाऊंचे भव्य स्मारक साकारले जाईल, अशी माहिती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी दिली.
साठे म्हणाले, शासनाने स्मारकासाठी २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र जागेचा प्रश्न प्रलंबित होता. तो प्रश्न मार्गी लागला असून वाटेगाव येथे शासकीय जागेवर स्थळ निश्चित झाले आहे.
स्मारकासंदर्भात आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली. बैठकीत १ ऑगस्टला अण्णा भाऊंच्या जन्मदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारकाच्या भूमिपूजनाबाबत चर्चा झाली.
सचिन साठे म्हणाले, अण्णा भाऊंच्या स्मारकासाठी अनुयायी राज्य व देशभर शासनस्तरावर मोर्चे, आंदोलने करत होते. याला प्रतिसाद देत खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करत २५ कोटीचा निधी मंजूर करून घेतला. समाजकल्याण सहायक आयुक्त मेघराज भाटे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, सरपंच नंदा चौगुले, माजी सरपंच सुरेश साठे यांनी यासाठी पाठपुरावा केला. आता जागा उपलब्ध झाल्याने कामास गती येणार आहे.
शिष्टमंडळात अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय सचिव गणेश भगत, प्रदेश अध्यक्ष राजभाई क्षीरसागर, कोअर कमिटी अध्यक्ष ऍड. त्र्यंबक कांबळे, पूर्व प्रदेश अध्यक्ष राधाकृष्ण साठे, आकाश घोलप आदी उपस्थित होते.
सत्यजित देशमुख यांचा पाठपुरावा-
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी मुंबई येथे आमदार सत्यजित देशमुख दिवसभर अण्णा भाऊंचे नातू सचिन साठे यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी उपस्थित होते. त्यांनी विशेष प्रयत्न केल्याने स्मारकाचा प्रलंबित आणि बहुचर्चित प्रश्न मार्गी लागल्याचे सचिन साठे यांनी सांगितले.
