इराण खवळला! अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इस्त्रायलवर पलटवार; 10 शहरांवर इराणी मिसाइल कोसळल्या.

Spread the love

इराण खवळला! अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इस्त्रायलवर पलटवार; 10 शहरांवर इराणी मिसाइल कोसळल्या.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. अमेरिकी बॉम्बर्सने इराणच्या आण्विक ठिकाणांवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यानंतर इराणही खवळला असून त्याने इस्त्रायलवर पलटवार केला आहे. इस्त्रायलच्या दहा शहरांना टार्गेट करुन हवाई हल्ले करण्यात आले. यात तेल अवीव आणि हाइफा यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये खळबळ उडाली आहे.

इस्त्रायलच्या सरकारी प्रसारक कननुसार इराणच्या ताज्या हल्ल्यात इस्त्रायलमधील 10 ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यांदरम्यान सायरन वाजले. यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली. याच दरम्यान हवाई हद्द पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा परिस्थितीचा विचार करून हवाई क्षेत्रातील सर्व उड्डाणे बंद केली आहेत. इस्त्रायलची प्रमुख एअरलाइन्स एल अल इस्त्रायल एअरलाइन्स आणि अर्किया एअरलाइन्सने पुढील आदेश येईपर्यंत सर्व उड्डाणे थांबवली आहेत.

राष्ट्रीय आपत्कालीन सेवा मागेन डेविड एडोमने अनेक ठिकाणचे नुकसान आणि जखमींची माहिती दिली आहे. या हल्ल्यात किती नुकसान झाले याची अचूक माहिती मात्र अजून समोर आलेली नाही. इराणच्या या हल्ल्यांना इस्त्रायलनेही लागलीच प्रत्युत्तर दिले. आयडीएफ पश्चिम इराण भागातील अनेक सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. आज सकाळी इस्त्रायली वायूसेनेने इराणी सशस्त्र दलांच्या सैनिकांवर हल्ले केले. मिसाइल डागणारे लाँचरही नष्ट करण्यात आले. इराणने केलेल्या बॅलेस्टिक मिसाइल हल्ल्यादरम्यान इस्त्रायली वायू संरक्षण इंटरसेप्टरमध्ये बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर भागातील शहरांत सायरन वाजले नाहीत.

IDF ने जारी केले निवेदन
होम फ्रंट कमांडच्या सुरुवातीच्या तपासानुसार हल्ल्यांदरम्यान कदाचि वायू रक्षा इंटरसेप्टरमध्ये बिघाड झाला असावा. या घटनेचा तपास केला जात आहे. या घटनेत तीन लोक जखमी झाले आहेत. इराणने दोन वेळा कमीत कमी 27 मिसाइल डागल्या आहेत. यातील एक मिसाइल तेल अवीवच्या रहिवासी भागात पडली. या हल्ल्यात 13 नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. दुसरी मिसाइल नेस त्जिओनाच्या घरांवर कोसळली. या हल्ल्यात सहा नागरिक जखमी झाले आहेत. सेंट्रल इस्त्रायलमध्ये बीर याकोव जवळ मार्गावर छर्रे लागल्याने एक व्यक्ती जखमी झाला.

अमेरिकेचे इराणच्या अणु प्रकल्पांवर हल्ले
अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी हवाई हल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याने पूर्ण तयारीने या ठिकाणांवर बॉम्ब टाकले. ज्यामध्ये फोर्डो हे मुख्य लक्ष्य होते, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांना दिली. विशेष म्हणजे, याआधी ट्रम्प यांनी इराणला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र मुदत संपण्याच्या कितीतरी आधीच हल्ले करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *